शैलेश नवाल यांच्या अधिकाऱ्यांना सूचना वर्धा : शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक अशा कार्यालयात शासकीय कामकाज आणि सेवा, सुविधांकरिता अर्जासह शपथपत्राची मागणी करण्यात येवू नये. त्याऐवजी स्वघोषणापत्र आणि कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती स्विकृत कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेथे जेथे विद्यमान कायदा किंवा नियम आहे अशा ठिकानांसाठी शपथपत्र अर्जासह सादर करणे आवश्यक राहील. मात्र त्यासाठी शपथपत्राची गरज नाही तेथे मागणी करण्यात येवू नये. त्याऐवजी स्वयंघोषणापत्र स्वीकारावेत. तसेच असे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर करता येतील. त्यासाठी न्यायीक कागदाची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे नागरी सेवा सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी राजपत्रित अधिकारी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या प्रति सादर कराव्या लागत होत्या. २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे यासाठी सुद्धा स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निर्देशांचे व शासन निर्णयाने पालन करण्यास टाळाटाळ होत झाल्यास व नागरिकांकडून तक्रारी येताच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)
स्वघोषणापत्र व स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारा
By admin | Updated: April 4, 2017 01:19 IST