सुदैवाने प्राणहानी टळली : चार लाख रुपयांचे नुकसानसेवाग्राम : धावत्या कारमध्ये स्पार्किंग होऊन गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सेवाग्राम ते पवनार मार्गावर घडली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने कुटुंब बचावले; पण कारमधील कागदपत्र व दोन मोबाईल जळून खाक झाले. यात चार लाख रुपयांचे नुकसान झाले.येथील कस्तुरबा रुग्णालयातील वैद्यक अभिषेक विजयकुमार राऊत (३७) हे रविवारी आपल्या कुटुंबासह पवनार येथे फिरावयास गेले होते. रात्री पवनार येथून सेवाग्रामकडे येत असताना खरांगणा (गोडे) मार्गाच्या काही अंतरावर कार क्र. एमएच ३२ सी ४७०६ च्या इंजिनला आग लागली. ही बाब लक्षात येताच गाडी थांबवून राऊत कुटुंब बाहेर पडले. दरम्यान, आगीचा भडका झाला आणि संपूर्ण गाडी जळून खाक झाली. गाडीत असलेली कागदपत्रे आणि दोन मोबाईल संचही काढण्यास वेळ मिळाला नाही. यात प्राणहानी झाली नसली तरी राऊत यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. याबबात डॉ. अभिषेक राऊत यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून राजकुमार कुवर व थुटे यांनी पंचनामा करताना केला. रात्री उशीरा सेवाग्राम पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे राऊत कुटुंब तथा परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.(वार्ताहर)
धावत्या कारने घेतला पेट
By admin | Updated: May 2, 2017 00:21 IST