२३ जुगाऱ्यांना अटक : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त वर्धा : आॅनलाईन जुगारावर बंदी असताना वर्धेतील दयालनगर भागात हा जुगार सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे धाड टाकून येथे जुगार खेळत असलेल्या तब्बल २३ जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये रोख व इतर साहित्यासह एकूण १४ लाख ९५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांत दीपक सचदेव, सेवक थदानी, मनीष नगराळे, उमेश शादीजा, भरत थदानी, निखील सुर्यवंशी, अमोल ठाकरे, माणिक जाधव, सतीश मदनकर, आकाश कांबळे, सुमीत रनपिसे, अनिल आहुजा, पंकज पंजवानी, हरिष जोशी, अंकुश जयस्वाल, सुरेश कांबळे, शुभम तेलतुमडे, रोशन धुर्वे, गणेश बालपांडे, हनुमंत ढाले, रोशन थुल, शुभम गणवीर, शुभम बुचुंडे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात असलेल्यांवर मुंबई जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रानुसार, शहरातील दयालनगरात मातामंदीर परिसरातील पंजवाणी याच्या घरी आॅनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. मुखबिरांच्या मदतीने या माहितीची शहानिशा केली असता ती खरी असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी माहिती असलेल्या घरावर छापा टाकून आॅन लाईन पद्धतीने मोबाईलवर तीन पत्ती खेळावर पैशाची हारजीतचा जुगार सुरू असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी तब्बल २३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख ६ हजार रुपये, २०० मोबाईल, चार्जर, २५ राऊटर, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्य असा एकूण १४ लाख ९५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या २३ जुगाऱ्यांना ठाण्यात आणत मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, विपीन रामटेके, इमरान खिलची, महादेव सानप, गोपाल बावनकर, सचिन वाटखेडे, दत्तात्रय ठोंबरे आदींनी केली.(शहर प्रतिनिधी)
आॅनलाईन जुगार अड्ड्यावर धाड
By admin | Updated: April 3, 2017 00:50 IST