वर्धा : बदलती जीवनशैली, वाढता तणाव, खाणपानात झालेले बदल याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अनेकांना यामुळे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीवही गमवावा लागला आहे. नागरिकांना या आजाराची माहिती व्हावी, त्यांनी आरोग्याची तपासणी करावी याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने एनपीसीडीसीएस कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एकूण एक लाख चार हजार ७७८ नागरिकांनी तपासणी केली. त्यापैकी आठ हजार ९८५ रुग्णांना उच्च रक्तदाबाने ग्रासल्याचे समोर आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी या आजारावर आळा मिळविण्याकरिता काय उपाययोजना कराव्या याची माहिती दिली. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एनसीडी कार्यक्रमांतर्गत विविध सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मधुमेह व इतर असंसर्गजन्य आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार करून भौतिकोपचारतज्ज्ञाच्या सहायाने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. डवले व एसीडीसी कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. सी. राऊत यांच्यासह एनपीसीडीसी कार्यक्रम राबविणारे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सात महिन्यात आढळले उच्चरक्तदाबाचे ८,९८५ रुग्ण
By admin | Updated: November 11, 2014 22:45 IST