वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्याकरिता १० हजार ४०० विहिरी मंजूर आहेत. सिंचन विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट मनरेगांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. यापैकी केवळ १२२ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे. तर ८९६ कामे प्रशासकीय यंत्रणेकडून येत असलेल्या अडचणीत अडकल्याची माहिती आहे. या अडचणी सोडवून विहिरींचे बांधकाम लवकर पूर्ण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी शुक्रवारी दिल्या. यावेळी अपर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त एम.ए.एच. खान, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, मुख्य कार्यपालन अधिकरी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हास्तरीय समितीकडे असलेल्या शेतकरी आत्महत्यासंबंधीची प्रकरणे कुटुंबांच्या वारसांना सानुग्रह अनुदान, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान, धडक सिंचन व जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेतला.शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेताना अनुपकुमार म्हणाले, जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे सात दिवसांत निकाली काढा, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना सानुग्रह अनुदान तत्काळ उपलब्ध करून देतानाच प्रत्येक गावांमध्ये शेतकरी कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्तरांवरील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी नियमित संवाद ठेवावा, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना मदत मिळावी यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मध्य प्रदेश प्रशासनाने सिंचन विहिरींचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यासह विभागात हा कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यावर भर देण्याबाबत अनूप कुमार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी स्वागत करून जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली. यावेळी लोअर वर्धा प्रकल्प, अपर वर्धा प्रकल्प, कार नदी प्रकल्पातील प्रलंबित कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.(प्रतिनिधी)
८९६ विहिरी लालफीतशाहीत
By admin | Updated: April 26, 2015 01:26 IST