प्राणहानी टळली : तीन लाख १० हजारांचे नुकसानहिंगणघाट : रात्री आलेल्या सततच्या पावसामुळे स्थानिक तहसील कार्यालय परिसरातील कडूलिंबाचे मोठे झाड मुळापासून कोलमडून पडले. यात एका कार आणि सायकल रिक्षाचे जवळपास ३ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. गुरूवारी सकाळी ही घटना घडल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही.बुधवारी रात्री ८ वाजता मुसळधार पावसाला सुरूवात होऊन सकाळपर्यंत ८७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. संततधार पावसामुळे तहसील कार्यालयाचे मुख्य गेट जवळचे कडूनिंबाचे सुमारे ५०-६० वर्षे जुने मोठे झाड मुळापासून कोलमडून कार व रिक्षावर कोसळले. ही घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी अर्जनवीस रमेश हिंगमीरे यांचा मुलगा नितीन हिंगमिरे हा कार क्र. एम.एच. ३२ सी. ५४०१ ने संगणक व कागदपत्रे घेऊन आला होता. दरम्यान, कारवर कडूनिंबाचे झाड कोसळले. तत्पूर्वी त्यांनी संगणक व सर्व साहित्य कारमधून बाहेर काढले होते. यामुळे इतर हानी झाली नाही; पण कारचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. लगतच्या सायकल रिक्षावरही झाड कोसळल्याने त्याचे १० हजारांचे नुकसान झाले. घटनेची तहसीलदार दीपक कारंडे यांनी पाहणी केली.(तालुका प्रतिनिधी)
तहसील कार्यालयातील ६० वर्षे जुने झाड कोसळले
By admin | Updated: July 24, 2015 01:55 IST