विकासाचा मार्ग मोकळा : लवकरच होणार आधुनिकीकरणाच्या कामांना सुरूवातवर्धा : शहरातील बसस्थानकाच्या विस्तारीकरण व सौंदर्यीकरणासाठी ५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. याबाबतच्या शासन आदेशाची प्रत मंगळवारी मुंबई येथे राज्याचे वित्तमंत्री व जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिली. पालकमंत्र्यांनी बसस्थानकाच्या विस्तारीकरणास निधी मंजूर करून वचनपूर्ती केल्याची प्रतिक्रिया आ.डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केली.वर्धा जिल्हा गांधी-विनोबांची कर्मभूमी असल्याने देश-विदेशातील पर्यटक तसेच मराठवाडा व अन्य भागातील नागरिकांना नागपूर येथे जाण्यासाठी वर्धा बसस्थानकावरूनच जावे लागते; पण मागील काही वर्षांपासून बसस्थानकाची स्थिती बिकट आहे. अनेक मुलभूत सुविधांचा अभाव आहे. बसस्थानक परिसरात प्रसाधन गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हॉटेल तसेच अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना फटका बसत होता. बसस्थानक परिसरात सिसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणे अवघड होते. बसस्थानक परिसरात दुकाने नसल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. वर्धा बसस्थानकावर येणाऱ्या बसेसची संख्या अधिक असल्याने त्या दृष्टीने फलाटांची संख्या कमी आहे. या सर्व बाबींचा विचार करून वर्धा शहरातील बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेत बसस्थानकाचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण व सौंदर्यीकरण व्हावे या दृष्टीने आमदारांनी प्रयत्न सुरू केले होते. ही बाब अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ५ आॅक्टोबर रोजी निधी देण्याची ग्वाही दिली होती.(कार्यालय प्रतिनिधी)
बसस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी ५.५३ कोटी मंजूर
By admin | Updated: April 13, 2016 02:21 IST