वर्धा पालिकेची कारवाई : आठ दुकानांवर धाडीवर्धा : प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे समोर आल्याने प्लास्टिक थैल्या वापरणे बंद करण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याने प्लास्टिकच्या थैल्या वापरात येत होत्या. यावर शासनाने पुन्हा आदेश काढत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. यानुसार शहरात मंगळवारी पालिकेच्यावतीने कारवाई करीत आठ दुकांनावर धाड घालण्यात आली. यात ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. शिवाय त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज पालिका प्रशासनाच्यावतीने कारवाईचा सपाटा सुरू केला. यात वर्धेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नायब तहसीलदार व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील आठ दुकानांवर कारवाई केली. यात दूर्गा टॉकीज समोर असलेल्या श्याम प्लास्टिक नामक दुकानावर धाड घालत २०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्याला हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अशीच कारवाई भामटीपुरा येथील सोनी प्लास्टिक, हिरासेठ प्लास्टिक, पटेल चौक येथील जय जगदंब प्लास्टिक, गुरुणानक प्लास्टिक यासह अन्य दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाई शिवाय पालिकेच्यावतीने शहरात भाजी विक्रीसह इतर व्यवसाय करणाऱ्या छोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांचीही झडती घेतली. त्यांना शासनाने दिलेल्या नव्या नियमांची माहिती देत त्यांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकथैल्या वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. ही धाड पालिकेचे मुख्यकार्यपालन अधिकारी शेटे, नायब तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली. हे धाड सत्र सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
५०० किलो प्लास्टिक थैल्या जप्त
By admin | Updated: November 4, 2014 22:43 IST