पर्यटकांमध्ये झाली वाढ : अनैतिक कृत्यांनाही बसणार आळाअरविंद काकडे आकोलीवर्धा शहरापासून अवघ्या १६ किमी अंतरावर असलेले मदन उन्नई धरण मनमोहक निसर्ग सौंदर्याने नटले आहे. धरणावर नेहमी पर्यटकांची गर्दी असते. पाटबंधारे विभागाने आता धरणाच्या भिंतीवर ४९ पथदिवे बसविले आहेत. यामुळे धरण परिसर उजळून निघाला आहे. शिवाय अनैतिक कृत्यांवर आळा घालणेही शक्य झाले आहे.जंगलाच्या कुशीत वसलेल्या धरण परिसरात धार्मिक व पौराणिक स्थाने असल्याने पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. जवळच कळवंतीचा महाल आहे. पुरातन हनुमान मंदिर आणि पायऱ्याची विहीर आहे. विशेष म्हणजे, मुस्लीम धर्मीयांचे आस्थेचे ठिकाण म्हणजे पिर साहीब दर्गाह आहे. यामुळे पर्यटकांसाठी मदन उन्नई धरण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. सजाजिकच येथे सायंकाळी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत होता. थोडी रात्र झाली तरी असुरक्षिततेची भावना पर्यटकांच्या मनात निर्माण होत होती. हा प्रकार टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणाच्या भिंतीवर सलग ४९ पथदिवे बसवित पर्यटकांची सोय करून दिली आहे. यामुळेच हल्ली रात्रीची वर्दळही वाढल्याचे दिसून येत आहे. मदन उन्नई धरण परिसर प्रकाशाने न्हावून निघाला आहे. रात्री जंगली श्वापदांचे दर्शन घेणेही सुलभ झाले आहे. जंगली श्वापद एकतर रात्री वा पहाटेच्या वेळी पाणी पिण्याकरिता येतात. यामुळे काही पर्यटक रात्रभर जागून वन्य प्राण्यांचे दर्शन घेतात. धरण परिसरात सायंकाळी जोडपेही फिरायला येत होते. काळोखात अनैतिक प्रकार घडत असल्याच्या चर्चा होत्या. आता पथदिवे लागल्याने अनैतिक बाबी टाळणे शक्य होणार आहे. धरण परिसर पथदिव्यांमुळे उजळून निघत असल्याने पर्यटक समाधान व्यक्त करताहेत.रात्रीची गस्त सुरू करणे गरजेचेकाही असामाजिक तत्वांकरिता मात्र धरणाच्या भिंतीवर लावण्यात आलेले पथदिवे सोईचे ठरले आहे. धरण परिसर जुगाऱ्यांचा अड्डाच झाला आहे. दिवसा कुठेतरी कोपऱ्यात रंगणारा जुगार आता पथदिव्यांमुळे रात्री १२ ते १ वाजेपर्यंत बिनधास्त सुरू राहत असल्याचे सांगण्यात येते. शिकारदार सुद्धा प्राण्यांच्या शोधात धरणावर टपलेले असतात. या सर्व गैरकामांची दखल घेत पोलीस आणि वनविभागाने मदन धरणावर रात्रीची गस्त सुरू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.पथदिवे गौणखनिज चोरट्यांच्या पथ्यावरमदन उन्नई धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जाते. मुरूम, माती आणि दगडांची बिनधास्तपणे चोरी केली जाते. दिवसा लपून-छपून होणारी ही चोरी आता पथदिवे लावण्यात आल्याने रात्रीही शक्य झाली आहे. हे पथदिवे गौण खनिज चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचेच दिसून येत आहे. चोरटे आता प्रकाश व्यवस्था झाल्याने रात्रीही उत्खनन करीत असल्याचे दिसून येत आहे. वन विभागासह पोलिसांनी याकडे लक्ष देत धरण परिसरात होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शिकाऱ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचेनैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मदन उन्नई धरण परिसरालगत जंगल भाग आहे. यामुळे धरणापर्यंत अनेक श्वापदं येतात. रात्री आणि पहाटेच्या वेळी पाणी पिण्याकरिता येणाऱ्या वन्य प्राण्यांवर शिकाऱ्यांची नजर असते. मदन उन्नई धरण परिसरात वावरणाऱ्या या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. वन विभागाने यासाठी उपाययोजना करणे तसेच पोलिसांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. यातून शिकारीच्या घटनांवर आळा घालता येऊ शकतो.
४९ पथदिव्यांनी उजळला मदन उन्नई धरण परिसर
By admin | Updated: September 19, 2016 00:51 IST