सरुळ शिवारात कारवाई : स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाहीवर्धा : सुगंधंीत तंबाखावर शासनाकडून बंदी असताना त्याचा साठा करून वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखू, गुटखा आणि पान मटेरीयलचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कार्यवाही शनिवारी सायंकाळी वर्धा-राळेगाव मार्गावरील सरूळ या गावाजवळ करण्यात आली. हा सुगंधीत तंबाखू नागपूर येथून राळेगाव येथे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याने त्यांनी वाहन पकडल्यानंतर अन्न सुरक्षा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता गुटखा व त्याची वाहतूक करणाऱ्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणाची पुढील कारवाई अन्न सुरक्षा प्रशासनाचे अधिकारी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या संदर्भात सदर विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणी वाहन चालक महेश धुर्वे रा. सुकळी (बाई) ता. सेलू जि. वर्धा याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, एम एच ४४ एम ४४७५ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून राळेगाव येथे मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखू घेवून जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच माहितीत असलेले घटनास्थळ गाठून सदर वाहन अडवून त्याची झडती घेतली. यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. वाहनात तंबाखू असल्याचे माहीत होताच त्यांनी ही माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची दिली. माहिती मिळताच विभागाचे ललित सोयाम, आर. बी. धाबर्डे व नारायण उईके यांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून जप्त केलेला तंबाखू व त्याची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या वाहनात केवळ चालक असून त्याच्यावर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, आचल मलकापूरे, मनोज चांदूरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)
४.३५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By admin | Updated: June 12, 2016 01:50 IST