वनविभागाची कारवाई : २० वर्षे जुने अतिक्रमणआकोली : उदरनिर्वाहासाठी भटकंती करीत येथील झुडपी जंगल सर्व्हे क्र. ८८ वर पक्की घरे बांधून गोसावी समाज स्थायी झाला. २० वर्षांपासून ते येथे वास्तव्य करीत असताना आता त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५३, ५४, ५४ अ अंतर्गत तीन दिवसांत घरे खाली करण्याचे आदेश वनविभागाने दिलेत. यामुळे ३५ कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनही सादर केले.गोसावी समाज हा भटका समाज म्हणून ओळखला जातो. भटकंती करून उदरनिर्वाह करण्यामुळे मुला-बाळांना शिक्षणाचा गंध नव्हता. विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन कुठे तरी स्थायिक व्हावे, या हेतूने २० वर्षांपूर्वी आकोली गावानजिक पडिक जमिनीवर गोसावी समाजाने प्रारंभी झोपड्या बांधल्या. वन विभागाने त्यावेळी हरकत घेतली नाही वा कधी नोटीसही बजावली नाही. कालांतराने झोपडीचे रूपांतर पक्क्या घरात झाले. एवढेच नव्हे तर सिमेंट काँक्रीटची पक्की घरे झाली. ग्रा.पं. ने नागरी सुविधा पुरविल्या. प्रत्येक घरात वीज आली. काहींना घरकूल योजनेचा लाभ मिळाला. या वस्तीत तीन हातपंप ग्रा.पं. ने बसवून दिले. नळ योजनाही आली. ३५ कुटुंबियांची मतदार यादीत नावे आली. शिधापत्रिका मिळाली, आधार निघाले. मतदान कार्ड मिळाले. भटक्या समाजाची मुले शाळेत जाऊ लागली. आरोग्य, पाणी, वीज या सर्व सुविधा शासनाने दिल्या. आता घर खाली करण्याची नोटीस आल्याने ते अस्वस्थ झाले. भटकंती थांबून कायम पत्ता, गावाची ओळख मिळाली; पण तिच पुसली जाते की काय, या चिंतेने नागरिक ग्रासले आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत नागरिकांना कायम पट्टे देत अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)
३५ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ
By admin | Updated: December 24, 2015 02:41 IST