आष्टी (शहीद) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्वतंत्र करण्याच्या मागणीसह इतर मागण्या घेऊन जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलनाचा संप सुरूच ठेवला आहे. बुधवारी २ जुलै ला आष्टी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींना कुलूप ठोकून चाव्या व शिक्के ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सर्व ग्रामसेवकांनी दिला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डि.एन.ई १३६ संघटनेच्या सूचनेप्रमाणे १ जुलै पासून जिल्ह्यात एक विस्तार अधिकारी, वेतनश्रेणी दूर करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ सुरूवातीपासून कायम करणे आदी मागण्यासह वरिष्ठांना निवेदन देण्यात आले. काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे काम ठप्प झाले आहे. सद्या शालेय विद्यार्र्थी प्रमाणपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात घीरट्या मारत आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ कामबंद आंदोलन मिटविण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. बुधवारी २ जुलै रोजी आष्टी पंचायत समिती कार्यालयात सर्व ग्रामसेवक एकत्र झाले. सर्वांनी गटविकास अधिकारी गावंडे यांची भेट घेवून आपल्या मागण्यासंदर्भात चर्चा केली व निवेदन सादर केले. सोबतच ग्रामपचांयतीच्या चाब्या आणि ग्रामसेवकांचे शिक्केही परत केले. यामुळे एकच खळबळ उडाली.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष डी. एस. निवटे, सचिव दिनेश पोहेकर, कार्याध्यक्ष संजय यावले सदस्य रमेश सावरकर, जीवन पेठे, रिजवान पठाण, लघुत्तमा धोटे, भाग्यशाली गवई, दिनेश धजेकर, मयुर इंगोले, रोशन धारपूरे, विनोद राठोड, नितीन साव, भैय्या जवंजाळ, चंदू चोपडे, शिवदास रेवस्कर, माधव मुसळे, मोरेश्वर रंगारी, मंगला नागपुरे, राहुल खेरडे यासह सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
आष्टी (श.) तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत कुलूपबंद
By admin | Updated: July 2, 2014 23:25 IST