९ लाख ८४ हजार ३०० रुपयांच्या अनुदानाचे वाटप गौरव देशमुख वर्धा ग्रामीण भागासह शहरी भागात संस्थात्मक प्रसुतींना वाव मिळावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांच्या कालावधीत ३ हजार १३६ मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ३ हजार १३६ मातांना जननी सुरक्षा योजनेमार्फत ९ लाख ८४ हजार ३०० रूपयांचे अनुदान देण्यात आले. आर्थिक विवंचनेमुळे गरजू कुटुंबातील गरोदर महिलेच्या आरोग्यावरील खर्च त्यांना झेपत नाही. अशा परिस्थितीत प्रसुती दरम्यान किंवा त्यापुर्वी मातेच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये म्हणून ही योजना आखण्यात आली. महिलेला योग्य पोषण आहार मिळावा. प्रसुती योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी योनजेतून अनुदान दिले जाते. गरोदर मातांना सुरक्षित प्रसुतीसाठी वेळोवेळी तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येतो. या योजनेतून गरोदर मातेला, गरोदरकाळ आणि प्रसुतीनंतरच्या कालावधीत आपला खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येते. जिल्ह्यात ही योजना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या देखरीखीत राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन जिवंत अपत्यापर्यंत लाभ दिला जातो. लाभासाठी मातेचे वय १९ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वय कमी असल्यास सदर महिला योजनेकरिता अपात्र ठरते. तसेच आरोग्य संस्थेत प्रसुती केल्यावर महिलेला ७०० रूपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात नेण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १०८ व १०२ वर संपर्क साधण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात काही दुर्गम भागात प्रसुतीसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने ही प्रसुती घरी होते. माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी ही बाब धोकादायक असते. आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास येथे योग्य काळजी घेतली जाते. अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जातो. आगामी काळात शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.
३ हजार मातांना मिळाली जननी सुरक्षा
By admin | Updated: February 23, 2017 00:51 IST