विशेष शिबिर : मॅमोग्रॅफी मोबाईल व्हॅनद्वारे महिलांच्या कर्करोगाचे निदानवर्धा : अत्याधुनिक मॅमोग्रॅफी व्हॅनद्वारे महिलांच्या कर्करोगाचे निदान रोटरी क्लब आॅफ गांधी सिटी व सावंगी मेघे येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट व मेडिकल सायन्सद्वारे करण्यात येत आहे. राज्यात नागपूर, भुसावळ, नाशिक, सटाणा, देवला, जळगाव, चाळीसगाव आणि अमळनेर येथे या व अन्य एका व्हॅनद्वारे सप्टेंबरपासून ३ हजार ५०० महिलांची मॅमोग्रॅफी करण्यात आली. यात ३५ संशयित रुग्ण आढळले तर १०० रुग्णांना सल्ला देण्यात आला आहे. ‘हरिमाला मॅमोग्रॅफी बस’ रोटरीचे गव्हर्नर महेश मोकलकर यांनी त्यांच्या आईच्या स्मृत्यर्थ रोटरीमार्फत दिली आहे. त्या बसचा प्रशासकीय खर्च वार्षिक १६ लाख रुपये सावंगी मेघे येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेतर्फे करण्यात येत आहे. या बससाठी २० केव्हीचे दोन जनित्र संस्थेमार्फत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे दत्ता मेघे यांनी दिलेत. मॅमोग्रॅफीसाठी खासगीरित्या तपासणीसाठी अंदाजे दोन ते अडीच हजार रुपये लागतात; पण या सुविधेमुळे महिलांच्या कर्करागाचे निदान मोफत करण्यात येत आहे. कर्करोग तपासणी, घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून योग्य सल्ला व उपचार करण्यात येतो. लग्नानंतर पॅप्समिअरची तपासणी व वयाच्या ३५ नंतर मॅमोग्रॅफी तपासणी आवश्यक असून प्रत्येक स्त्रीने दोन वर्षातून एकदा तसेच संभाव्य धोका असणाऱ्या स्त्रियांनी मॅमोगॅ्रफी करणे आवयक असल्याचे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदाराणी फुटाणे यांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्यांसाठी तीन विशेष तपासणी शिबिर विश्रामगृहात घेण्यात आले. यात ७० स्त्रियांची तपासणी झाली. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महेश मोकलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
३ हजार ५०० महिलांची तपासणी
By admin | Updated: April 15, 2016 02:40 IST