यवतमाळ : जमिनीचे भाव आता सोन्यासारखे झाले आहे. शहरांमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही. या स्थितीत कुणी इंचभर जमीनही सोडायला तयार नाही. मात्र, यवतमाळातील शेख झब्बू शेख रन्नू (कालीवाले) या शिक्षणप्रेमीने केंद्रीय विद्यालयासाठी चक्क २० लाखांची जमीन दान केली आहे. यवतमाळातील केंद्रीय विद्यालयाचा वाढता विस्तार पाहता सध्याची गोधणी मार्गावरील जागा अपुरी पडत आहे. ही जागा केंद्रीय विद्यालयाच्या मालकीची नाही. यामुळे नागपूर ते धामणगाव मार्गावर ई-क्लासची ९.७५ हेक्टर जागा केंद्रीय विद्यालयासाठी मंजूर करण्यात आली आहे. या ठिकाणी लेव्हलिंगचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय विद्यालयात पोहोचणारा रस्ता दीड किलोमीटर वळणाने पोहोचणारा आहे. परंतु, केेंद्रीय विद्यालयाच्या नियमानुसार संपर्क रस्ता मुख्य रस्त्यातून जाणे बंधनकारक आहे. हा प्रमुख रस्ता शेख झब्बू शेख रन्नू (कालीवाले) यांच्या शेतातून जातो. त्यामुळे केंद्रीय व्यवस्थापन समितीने ६० बाय १०० अशी सहा हजार स्क्वेअर फूट जागा शेतकऱ्याला मागितली. शेख यांनी शिक्षणासाठी योगदान आणि सामाजिक कार्य म्हणून सहाऐवजी दहा हजार स्क्वेअर फूट जागा दान केली. या जमिनीची किंमत २० लाखांच्या घरात आहे. त्यांनी ही जमीन केंद्रीय विद्यालयाला दान करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाकडे सादर केले आहे. या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. शेख यांच्या योगदानाने केंद्रीय विद्यालयापुढील मोठा पेच सुटला आहे. (शहर वार्ताहर)
२० लाखांची जमीन शाळेसाठी दान
By admin | Updated: October 6, 2015 03:12 IST