नाबार्डचा उपक्रम : समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यासाठी आयोजनवर्धा : नाबार्डतर्फे समुद्रपूर व हिंगणघाट येथील शेतकऱ्यांसाठी वित्तीय साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या मेळाव्याला दोन्ही तालुक्यातील १५० शेतकऱ्यांचा तसेच ग्रामीण युवक-युवती आणि बचत गटांचा समावेश होता. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान आरएसईटीआय यांनी नाबार्डच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने अग्रणी जिल्हा बँक, बीओआयचे विजय जांगडा आणि नाबार्डच्या एजीएम डॉ. स्रेहल बन्सोड यांनी बँकेमार्फत राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती, जन-धन योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना याबद्दलची सखोल माहिती दिली. या कार्यक्रमात आरएसईटीआय ची कार्यक्रमावली विस्तृत रुपात देण्यात आली. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. नेमाडे यांनी कापूस तंत्रज्ञानावरही सविस्तर माहिती दिली. नाबार्डने समुद्रपूर व हिंगणघाट क्षेत्रात विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या सहकार्याने कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन (केजीबीएफ) द्वारे ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या योजनेविषयीही माहिती यावेळी देण्यात आली. तसेच शेतकरी व युवक युवतींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही केले. यशस्वीतेकरिता नामदेव गुजरकर, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक अविनाश पडोळे, यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
वित्तीय साक्षरता जनजागृती मेळाव्यात १५० शेतकरी सहभागी
By admin | Updated: July 13, 2015 02:12 IST