उंच उड्डाण : मेनका गांधींनी केले खासदारांच्या उपक्रमाचे कौतुकवर्धा : गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनाही विमान प्रवास करता यावा यासाठी खासदार रामदास तडस यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला. वर्धा मतदार संघातील १४ विद्यार्थ्यांना त्यांनी स्व-खर्चाने विमान प्रवास घडविला. सदर विद्यार्थी दिल्ली येथे पोहोचले असून बुधवारी त्यांनी शास्त्री भवन येथे महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांची भेट घेतली.शास्त्री भवन दिल्ली येथील कार्यालयात ना. गांधी यांनी खा. तडस यांच्या उंच उड्डाण या उपक्रमाचे स्वागत केले. सर्व खासदारांनी आपल्या क्षेत्रात असे उपक्रम राबवावे, असे आवाहन केले. शिवाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वर्धा येथील करुणाश्रमाबाबत माहिती दिली. सर्व गावांत पशुवैद्यकीय सहायक असावा, यासाठी मुलांना पशुवैद्यकीयचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही खा. तडस यांना केले. १ ते ४ मार्च या कालावधीत हा शैक्षणिक दौरा आयोजित आहे. यानुसार १४ विद्यार्थी मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावरून विमानाने दिल्लीला रवाना झाले. बुधवारी विद्यार्थ्यांनी इंडिया गेट व शास्त्री भवन पाहिले. गुरूवारी राष्ट्रपती भवन, संसद भवन व संसदेचे कामकाज पाहतील. सोबतच विविध सचिवालयांच्या कामकाजाचे अवलोकन करतील. विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून दिली जाणार आहे. खा. तडस, देवळीच्या नगराध्यक्ष शोभा तडस, सचिव मनोज वर्मा तथा दिल्ली येथील कार्यालयीन कर्मचारी सोबत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शुक्रवारी सर्व विद्यार्थी राजधानी एक्सप्रेसने नागपूरपर्यंत येणार आहेत.तत्पर्वूी वर्धेत खा. तडस यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा संघचालक रामदास डोणे, बाळासाहेब लुले, महेंद्र जोशी, माधव कोटस्थाने, मुकेश भिसे, दीपक फुलकरी, जयंत येरावार, हरीश तांदळे, संतोष सेलूकर, दशरथ भुजाडे, हरीश तडस, अतुल कुऱ्हाडकर, अविनाश ताकसांडे व पालक उपस्थित होते. भारताचे संविधान, संसदीय प्रक्रिया, लोकशाही, मंत्रालयीन माहिती आदी सर्व बाबी विद्यार्थ्यांना कळाव्या या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)
१४ होतकरू विद्यार्थी पंतप्रधानांच्या भेटीला
By admin | Updated: March 3, 2016 02:06 IST