सामूहिक प्रयत्नांतून शेतपांदण मोकळीआष्टी (श.) : गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोकळा करण्यात आला. सामाजिक भावना कायम असल्याचा परिचय करून देत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जागा दिली. परिणामी, पांदण रस्ता बहाल झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पुढाकारामुळे पांदण रस्ता मोकळा झाला.लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्ता गत अनेक वर्षांपूर्वी पीक पेरणीमुळे बंद झाला होता. सदर पांदण मोकळी करून वहिवाट बहाल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. सदर प्रकरण तहसील कार्यालयात चौकशीसाठी आले. तहसीलदार सीमा गजभिये यांनी सदर पांदण रस्त्याची पाहणी करून वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. याप्रकरणी शेतकऱ्यांनी शिवपांदण सामूहिक सहभाग घेत मोकळी करावी, असे नोटीस तहसील कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांना बजावले. याला सहमती दर्शवित दहा शेतकऱ्यांनी स्वत:ची प्रत्येकी पाच फुट जागा दिली. यामुळे जेसीबीद्वारे पांदण रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी एका लोकप्रतिनिधीने अतिक्रमण केलेच नसल्याची बाब स्पष्ट झाली. उलट त्यांनी शेतात स्वत: हजर राहून महसूल प्रशासनाला सहकार्य केले. रस्त्यावरील अतिक्रमण सर्व दहा शेतकऱ्यांनी मोकळे केल्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सुमारे ५०० मिटरचा पांदण रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता या मार्गाने बैलबंडी, ट्रॅक्टर जाण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी समयसुचकता दाखवून रस्ता मोकळा करण्यासाठी सामूहिक सहकार्य केल्याने तहसीलदार गजभिये यांनीही समाधान व्यक्त केले. याच पद्धतीने तालुक्यातील अन्य अतिक्रमणामुळे बंद रस्ते मोकळे करावे, असे आवाहनही तहसीलदार गजभिये यांनी केले. यासाठी महसूल विभागाकडून मदत केली जाणार आहे.(प्रतिनिधी)
१० शेतकऱ्यांनी दिली प्रत्येकी पाच फूट जागा
By admin | Updated: February 10, 2016 02:41 IST