अरुण फाळके कारंजा (घाडगे)तालुक्यातील धवसा येथील दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण पुढे येण्याकरिता काढलेला व्हिसेरा तपासणीकरिता न पाठविता १० दिवसांपासून येथील तहसील कार्यालयातच कुलूपबंद असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. यामुळे या दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत तालुका प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तत्काळ तो व्हिसेरा तपासणीकरिता पाठविणे अनिवार्य आहे. येथे मात्र तहसील कार्यालयाकडूनच या नियमांना तिलांजली देण्यात आली. त्या चिमुकल्यांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या बाबीला दहा दिवस लोटूनही तो व्हिसेरा तहसील कार्यालयातच कुलूपबंद आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र आल्याशिवाय तो पाठवू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविका, तसे पत्र वेळीच देण्यात येते. तसे न झाल्यास तहसील कार्यालयाने ते मागविणे गरजेचे आहे. असे असताना त्या दोन्ही चिमुकल्यांचा व्हिसेरा तहसील कार्यालयात असणे हे न उलगडणारे कोडे आहे.मोरेश्वर वझरकर (१२ व शैलेश करणके (१५) दोन्ही रा. धवसा या दोघांचा चार महिन्यांपूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून नाही, तर अन्य कारणाने झाल्याचा आरोप त्या मृत बालकांच्या पालकांनी केला होता. यावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. याला दहा दिवसांचा कालावधी झाला आहे. तरीही व्हिसेरा तहसील कार्यालयातच पडून आहे. यामुळे तालुका प्रशासन या दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूचा खेळ करीत असल्याचा आरोप गावातून होत आहे. व्हिसेरा पाठविण्यात उशीर का होत आहे, याबद्दल शंका कुशंका व्यक्त होत आहे.
१० दिवस लोटून ‘त्या’ चिमुकल्यांचा व्हिसेरा तहसील कार्यालयातच
By admin | Updated: May 17, 2015 02:26 IST