- चेतन एरंडे
कोड कॉम्बॅटमध्ये मुलांना गेम्सच्या माध्यमातून पायथॉन शिकता आले. त्यामुळे पायथॉन नक्की काय आहे हे त्यांना समजले. मात्र त्याचा उपयोग नक्की कशासाठी केला जातो हे मात्र त्यांच्या लक्षात आले नव्हते.पुन्हा एकदा त्यांनी शिक्षक बदलायचे ठरवले. आता शिक्षक निवडायचा तर त्या विषयातला दादाच असला पाहिजे असे मुलांनी ठरवले. स्नेहला एडेक्स (EDX) हा प्लॅटफॉर्म वापरून जगातल्या नामवंत विद्यापीठांकडून घरबसल्या शिकता येऊ शकते, याची माहिती होती, ती त्याने इतर मुलांबरोबर शेअर केली.एडेक्स वर मुलांना मायक्रोसॉफ्ट कडून पायथॉन शिकता येईल हे समजले आणि मुलांना पुन्हा जोश आला! मायक्रोसॉफ्ट सारख्या मातब्बर संस्थेकडून शिकत असल्याने मुलांना ही प्रोग्रामिंग लँग्वेज नक्की कशासाठी वापरतात हे समजू लागले. गंमत म्हणजे आम्ही मुलांना विचारण्याऐवजी आता मुलेच आम्हाला ते रोज काय शिकत आहेत? हे उत्साहाने सांगू लागली.त्यांच्या आजूबाजूला एखादे ?प्लिकेशन दिसले किंवा एखादा प्रॉब्लेम दिसला की तो पायथॉनच्या मदतीने कसा सोडवता येईल? याविषयी देखील मुले भरभरून बोलू लागली होती. आपल्या शिकण्याने आपल्या आजूबाजूच्या जगात आपण बदल घडवून आणू शकतो हा आत्मविश्वास त्यांना स्वत:हून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करीत होता, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आम्हाला या निमित्ताने कळली.