तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो. एकेकाळी इथे लोकांची मोठी वस्ती होती. पण आता हे ठिकाण पूर्णपणे रिकामं झालं आहे.
धनुषकोडी येथे दिवसा खूप लोक भेट देतात. पण रात्र होताच लोक येथून निघून जातात. कारण इथे अंधारात फिरण्यावर बंदी आहे. लोक सांयकाळ होताच रामेश्वरमला परत जातात. कारण धनुषकोडीपासून रामेश्वरमचं अंतर १५ किलोमीटरचं आहे. आणि हा रस्ता फारच शांत आणि भीतीदायक आहे. अनेक लोक या ठिकाणाला भूताचं ठिकाण असंही म्हणतात.
१९६४ मध्ये आलेल्या भयावह चक्रीवादळाआधी धनुषकोडी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तीर्थ स्थळ होतं. त्यावेळी इथे रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, चर्च, हॉटेल आणि पोस्ट ऑफिस अशा सगळ्याच सुविधा होत्या. मात्र, चक्रीवादळात सगळंच नष्ट झालं. असे म्हणतात की, त्यावेळी १०० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणारी रेल्वे समुद्रात बुडाली होती. त्यानंतर या ठिकाणी कुणी आलंच नाही.
पौराणिक मान्यतांनुसार, धुनषकोडी हे तेच ठिकाण आहे, जिथे समुद्रावर रामसेतुचं निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हणतात की, या ठिकाणी भगवान रामाने हनुमानाला एका पुलाचं निर्माण करण्याचा आदेश दिला होता. ज्यावरून वानर सेना लंकेत गेली होती. या ठिकाणी भगवान रामाचं एक मंदिरही आहे.
असे म्हणतात की, रावणाचा भाऊ विभीषण याच्या विनंतीवरून भगवान रामाने धनुष्याच्या एका टोकाने सेतु तोडला होता. त्यामुळेच या ठिकाणाचं नाव धनुषकोडी पडलं आहे.