ठाणे : श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे काढण्यात येणारी यंदाची नववर्ष स्वागतयात्रा ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर आधारीत असेल. विशेष म्हणजे यंदा स्वागतयात्रेत महिला रिक्षा चालकांना सहभागी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.यात्रेचे हे १६ वे वर्ष आहे. यावर्षी गुढीपाडवा २८ मार्च रोजी असल्याने या संदर्भात विश्वस्तांची व कार्यकर्त्यांची पहिली सभा सोमवारी कौपीनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्र सभागृहात झाली. गेल्यावर्षी तलावाभोवती गंगा आरती केली होती. त्याच पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियानाची आरती तलावाभोवती करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. वातावरण निर्मितीसाठी तरुणांच्या स्पर्धा, स्वागतयात्रेच्या पुर्व संध्येला लाईव्ह आर्ट करणारे कलाकारांना निमंत्रित करता येईल का? तलावाच्या चार कोपऱ्यात चार कार्यक्रम, आरती गायन स्पर्धा, समूह गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धा आणि कार्यक्रम करता येतील का असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी त्यांचा सहभाग याबद्दलदेखील चर्चा झाली. यंदा कौपिनेश्वर मंदिर ते कौपिनेश्वर मंदिर अशी यात्रा न करता यात्रेची सुरूवात कौपिनेश्वर मंदिरपासून करुन चिंतामणी चौक, नमस्कार हॉटेलचा चौक किंवा गडकरी रंगायतन येथे समारोप किंवा दुसऱ्या ठिकाणांहून यात्रा सुरू करुन ती कौपिनेश्वर मंदिर येथे समाप्त करण्यासंदर्भात सूचना मांडण्यात आली. यावेळी श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणेची कार्यकारिणी जाहीर झाली. यात कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, निमंत्रक अंजली शेळके - ढोकळे, विश्वस्त, सचिव, अश्विनी बापट, खजिनदार श्रीनिवास जोशी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मुयरेश जोशी, रवींद्र कऱ्हाडकर, विद्याधर वालावलकर, आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
यंदा स्वच्छ भारत अभियान
By admin | Updated: January 25, 2017 04:37 IST