भार्इंदर : यंदाची पावसाळापूर्व नालेसफाई केवळ ५० लाखांत अशक्य असल्याचा दावा करीत आरोग्य विभागाने त्यात आणखी एक कोटीची वाढ मिळावी, यासाठी स्थायीला साकडे घातले आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने समितीच्या बैठकीलाच गालबोट लागले आहे. परिणामी, बैठक आयोजनाला मंजुरी मिळण्यासाठी विभागाने थेट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाच गळ घातली आहे. शहरात १५५ लहानमोठे नाले असून पावसाळ्यात त्यातील पाण्याच्या निचऱ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पालिका पावसाळापूर्व नालेसफाई करते. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच यंत्रसामग्रीचा खर्च सुमारे दीड कोटी इतका जात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. विभागाच्या अंदाजपत्रकानुसार दोन वर्षांपासून नालेसफाईला दीड कोटी मंजूर केले होते. यंदा मात्र त्याच्या खर्चात कपात करून तो थेट ५० लाखांवर आणण्यात आला आहे. त्याला स्थायीने मंजुरीही दिली. मात्र, या खर्चात नालेसफाई कशी उरकणार, असा आरोग्य विभागाचा सवाल आहे. नालेसफाईसाठी पोकलेन, जेसीबी, फ्लोटिंग बोट, सुमारे ३०० सफाई कामगार या यंत्रणेला दिवसाकाठी लाखोंचा खर्च येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ५० लाखांचा निधी १५५ नालेसफाईसाठी अपुरा आहे. या खर्चात नालेसफाई होणे अशक्य असल्याचा दावाही विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पुरेशा निधीअभावी कशी पूर्ण करायची, असा यक्षप्रश्न आरोग्य विभागापुढे उभा ठाकला आहे. वाढीव निधीला मंजुरी मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने स्थायी समितीलाच बैठक आयोजित करण्याचे साकडे घातले आहे. आचारसंहितेच्या काळात बैठक आयोजित करणे उल्लंघन करणारे ठरत असल्याने स्थायीने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे विभागाने बैठक आयोजनाला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळावी, यासाठी थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाच विनंती केली आहे. तसे पत्र ७ मे रोजीच धाडण्यात आले असून निवडणूक प्रशासनाने अद्याप त्यावर दिलेले नाही. त्यामुळे विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अद्याप नालेसफाईला सुरुवातच केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने शहरात कोणतीही विकासकामे करणे शक्य नाही. त्यामुळे नालेसफाईची कामेही रखडली आहेत. आचारसंहिता लागू होणार असल्याची कल्पना पालिका प्रशासनाला असतानाही रस्त्यांची डागडुजी आणि नालेसफाईच्या कामांचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे आता नालेसफाईला विलंब होणार आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच नालेसफाई करता येणार आहे. मागील वर्षीही १८ मेपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे नालेसफाई रखडली होती. यंदा १० मे उलटून गेल्यावरही शहरातील नालेसफाईला सुरु वात झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे. बदलापुरात कात्रप, शिरगाव, जुवेली, खरवई, बॅरेज रोड, हेंद्रेपाडा, बेलवली, मांजर्ली, स्टेशन रोड, रेल्वे लाइनला लागून असलेल्या परिसरातून शहरातील मुख्य नाले वाहतात. आचारसंहितेतून नालेसफाईचे काम वगळावे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंदा पावसापूर्वी नालेसफाई करण्याचेच आव्हान
By admin | Updated: May 13, 2016 01:57 IST