ठाणे : गिरगाव येथे रविवारी ‘मेक इन इंडियाअंतर्गत ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या भीषण आगीची दुर्घटना लक्षात घेता नाट्यसंमेलनात दक्षता घेतली जाणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य रंगमंचाला लोखंडी कठड्यांचा आधार दिला जात असून पुढील बाजूला कापडाचा वापर न करता प्लायवूड वापरण्यात येणार आहे. ठाण्यात आयोजित केलेले ९६ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन न भुतो न भविष्यती असेल, असे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रविवारी गिरगाव येथे घडलेली दुर्घटना लक्षात घेता नाट्यसंमेलनात उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे रंगमंच उभारणारे कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी सांगितले. स्टेडियमचा मुख्य रंगमंच हा दक्षिण दिशेला उभारला जात असून तो ८० बाय ६० फुटांचा असणार आहे. यात ८० बाय ४२ फूट हा भाग सादरीकरण आणि सजावटीसाठी, तर उर्वरित १६ फुटांचा ग्रीन रुमसाठी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे रंगमंचावरच ग्रीन रुम उभारली जात असून कलाकारांना रंगमंचावर प्रवेश घेणे सोयीचे होणार असल्याचे धबडे म्हणाले. ८० बाय १२ फुटांमध्ये सजावट उभारली जात आहे. सादरीकरणासाठी ८० बाय ३२ फुटांची जागा उपलब्ध असेल. उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाची उंची जमिनीपासून साडेआठ फूट आहे. या रंगमंचावरच्या सजावटीतून ठाण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे. रंगमंचाच्या मध्यभागी १५ फुटी फायबरची नटराजची मूर्ती असणार आहे. डाव्या बाजूला गडकरी रंगायतनवर असलेली राम गणेश गडकरी, किर्लोस्कर व बालगंधर्व यांची शिल्पे असतील. उजव्या बाजूला शहराची संस्कृती असेल. डाव्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या विंगेचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवण्यात येणार आहे. उजव्या बाजूला निवेदनासाठी पोडीयम उभारले जात असून त्यामागे असलेल्या विंगेवर नाटकाचे मुखवटे असतील.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
By admin | Updated: February 16, 2016 02:39 IST