सुरेश काटे , तलासरीसाहेब माझ्या भात शेतीचे नुकसान करू नका मेहनतीने वाढवलेली झाडे तोडू असे काकुळतीने वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगूनही बोर्डी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तलासरी तालुक्यातील मौजे उपलाट येथील आदिवासी अपंग शेतकऱ्याची भात शेती उद्धवस्त करून शेकडो वृक्षाची कत्तल वन अधिकाऱ्यांनीच खाजगी कंपनीच्या पाईप लाइनसाठी केली. ग्राम पंचायतीला व वन हक्क समितीला विचारात न घेता मनमानी हुकूमशाही पध्दतीने ही वृक्षतोड झाल्याने आदिवासी शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील उपलाट हे पेसा अंतर्गत गाव असल्याने ग्राम सभेला विशेष महत्व आहे, असे असतांना खाजगी कंपनीची पाइप लाइन गावातून जात आहे. या पाइपलाइनमुळे अनेक आदिवासी शेतकऱ्याची शेती व वृक्ष बाधीत होत आहेत. पावसाळ्यात आदिवासी शेतकऱ्यांनी शेती केली असून भात पीक काढल्यानंतर व पाइप लाइनसाठी जमिनी व वृक्षाचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिल्यावर वृक्ष तोड करा असे ग्रामपंचायत व वन हक्क समितीने सांगूनही अचानक वन अधिकाऱ्यांनी मनमानी करून आदिवासी शेतकऱ्याची भात शेती उद्धवस्त करून वृक्ष तोड केली.एकीकडे दोन कोटी वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयन्त सुरु असतांना वन अधिकाऱ्याकडून खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी असंख्य वृक्षाची बेसुमार तोड सुरु असल्याने वन अधिकारी वन रक्षक आहेत कि वन भक्षक हा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.उपलाट येथील मणीलाल वेस्ता धोडी व भिकू दिवाल वाडू यांच्या भात शेतीचे नुकसान करून त्यांच्या जमिनीतील साग, खैर, सुबाभूळ इत्यादी झाडांची तोड या शेतकऱ्यांचा विरोध असतांना वन अधिकाऱ्यांनी केली. या वेळी अपंग असलेल्या मणीलाल धोडी या शेतकऱ्याने त्यांना विरोध केला. त्याला धमकावून आम्हाला केंद्रांचे आदेश आहेत, असे सांगून वृक्ष तोड केली. या वेळी वन हक्क समितीचे अध्यक्ष रमेश पाटकर यांनी अधिकाऱ्यांना हटकले. त्यावर आम्हाला आदेश आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण ग्रामस्थ आक्र मक होताच वन अधिकारी निघून गेले.
उपलाटमध्ये वनरक्षकच झाले वनभक्षक
By admin | Updated: September 1, 2016 02:41 IST