ठाणे : दिव्यांगांच्या सादरीकरणाने ३२० क्रमांकाचा अभिनय कट्टा लक्षवेधी ठरला. या मुलांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या कार्यक्रमांतर्गत विविध सादरीकरणांनी कट्ट्याला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून दिले.कट्ट्यावर दिव्यांग मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पाचदिवसीय मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचा सांगता समारंभ रविवारी पार पडला. या सर्व मुलांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनेचे सामूहिक पठण केले. यानंतर, त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषांत येऊन प्रेक्षकांची मने जिंकली. राजा, काश्मीर की कली, पोलीस, वारकरी अशा वेगवेगळ्या भूमिका निभावताना या मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. त्यांच्या कलाकृतीचे कौतुक करीत एकामागून एक पडणाऱ्या टाळ्यांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. एरव्ही, शब्दही न बोलता येणाऱ्या यातल्या काही विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक रससिद्धान्तावर आधारित काही वाक्ये बोलून दाखवली आणि उपस्थितांना अबोल केले. या कार्यक्र माचे निवेदनसुद्धा यातील एक कलाकार विजय जोशी यानेच केले होते. दिव्यांग कला केंद्र या संकल्पनेचे जनक, कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि हा उपक्र म वर्षभर असाच चालू ठेवण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी त्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे मदतीचे आवाहनही केले. महापालिकेचे उपसमाज विकास अधिकारी डी.एस. गुंडप यांनी या कार्यात पालिकेचा नक्कीच पुढाकार असेल, असे आश्वासन दिले. या सर्व कलाकारांनी वेगवेगळी गाणी, कविता म्हणून त्यांच्या स्मरणशक्तीची ओळख उपस्थितांना करून दिली. मुलांचा गोड आवाज आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे गाणे बोलतानाचा आनंद पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. नंतर, या मुलांनी मिळून ‘मेरे पापा..’ या हृदयस्पर्शी गाण्यावर नृत्य सादर केले. या सादरीकरणात पालकांचाही सहभाग होता. प्रारंभी अभिषेक सावळकर याने ‘तो मी नव्हेच’ या अजरामर कलाकृतीतील लखोबा लोखंडे हे पात्र सादर करून लोकांना पणशीकरांची आठवण करून दिली, तर पुढे स्वप्नील माने याने ‘आटपाटनगरीचा राजा’ या भावनिक एकपात्रीद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सई कदमने नृत्याभिनय सादर करून प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले. आरती ताथवाडकर यांनी ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील एक प्रवेश सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. (प्रतिनिधी)
दिव्यांगांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद
By admin | Updated: April 18, 2017 03:19 IST