ठाणे : येथील खोपट, सिद्धेश्वर तलाव येथे कचऱ्याच्या कुंडीत पाणी शुद्धिकरणासाठी वापरले जाणारे गॅस सिलिंडर टाकल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. प्रशासकीय यंत्रणेची चांगली धावपळ झाली. सुदैवाने ते सिलिंडर रिकामे असल्याचे समजल्यावर प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला. कचराकुंडीत टाकलेले तिन्ही सिलिंडर जप्त केले असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खोपट सिद्धेश्वर तलाव परिसरातील कचराकुंडीत तीन गॅस सिलिंडर टाकल्याचे समोर आल्यावर स्थानिकांनी तातडीने ही माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. गॅस सिलिंडर कचराकुंडीत टाकल्याने, स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, केलेल्या पाहणीत ते पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जात असल्याचे उघडकीस आले. हे सिलिंडर एका कंपनीचे असून, एका कामगाराने ते कचराकुंडीत टाकून तेथून पळ काढल्याचे पुढे आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पुढील कारवाई पोलीस करत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.