ठाणे : मुरबाड तालुक्यातील काही आदिवासीपाड्यांमध्ये आठ दिवसांपासून ‘हिरव्या देवाची यात्रा’ हा महोत्सव सुरू करून जंगल संवर्धनाच्या उपाययोजना व जंगलाचे महत्त्व पटवून देणाऱ्या विविध स्पर्धा घेतल्या. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या यात्रेत सहभाग घेऊन पाड्याच्या समस्या समजून घेतल्या. याशिवाय, जंगल संरक्षण करण्यास उपयुक्त ठरणारे टेहळणी टॉवर शिरवाडी या गावासाठी मंजूर केले. जंगलाचे संरक्षण करणाऱ्या या आदिवासींना मोठमोठे वनपट्टे मिळालेले आहेत. पण, ते गावात असताना या जंगलातील झाडांची चोरीने कत्तल केली जाते. वणवे लावले जातात. लाकडांची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. यास कायमचा आळा घालण्यासाठी गावाजवळ मोठे टॉवर उभारून रात्रीबेरात्री त्यावरून जंगलाची पाहणी करणे शक्य आहे. यासाठी गावात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना या आदिवासींनी स्वत:ऐवजी जंगल संरक्षणासाठी टॉवर उभारणीची मागणी केली. एक टॉवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मंजूर करून इतर गावांच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले. सध्या उद्भवलेली दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी व पाण्याची उपलब्धता होण्यासाठी जंगलात पावसाचे पाणी जिरवण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. रोजगार हमीद्वारे ही कामे हाती घेऊन लोकांना रोजगारही उपलब्ध करणे शक्य होणार आहे. या वेळी येथील आदिवासी कुटुंबीयांनी वृक्षलागवडीसाठी सात हजार ८९९ वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यासाठी महसूल व वन विभागाने रोपे उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. या महोत्सव कालावधीत ७१ मुलांनी पर्यावरण प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभाग घेतला. मुलांनी पर्यावरण प्रश्नमंजूषा स्पर्धेत भाग घेतला. पाच गावांतील ७१ महिलांनी रानभाज्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
शिरवाडी गावाला जंगल संरक्षणासाठी टेहळणी टॉवर
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST