राजू काळे , भार्इंदरमीरा रोड येथील शिवार गार्डनच्या आरक्षित जागेवर चार वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर सुरू केलेल्या वर्धमान फॅण्टसी या मनोरंजन पार्कची पालिकेला देय असलेली सुमारे ४५ लाखांची रक्कम वारंवार नोटिसा धाडूनही व्यवस्थापनाने ती थकवल्याने प्रशासनाने अखेर त्या पार्कला गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास सील ठोकल्याचे प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.पालिकेने येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली सुमारे ४५ हजार चौमी जागा विजय वर्धमान या मुंबईतील विकासकाला बीओटी तत्त्वावर मनोरंजन पार्क विकसित करण्यासाठी दिली होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. या मनोरंजन पार्कमध्ये शहरवासीयांना सुमारे २ रु. प्रतिव्यक्तीप्रमाणे किफायतशीर दरात प्रवेश शुल्क आकारण्याचे निश्चित केले असले तरी त्याच्या आतील मनोरंजन महागडे ठरत असल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेने अनेकदा केलेल्या कारवाईतून उजेडात आले आहे. या जागेच्या वापरापोटी पार्कच्या चालकाकडून पालिकेला सुमारे २५ लाख रु. वार्षिक भाडे देण्याचे निश्चित केले आहे. ते थकवल्याप्रकरणी पालिकेने काही महिन्यांपूर्वी हे पार्क सील केले होते. तसेच बिल थकवल्याप्रकरणीसुद्धा वीज कंपनीने या पार्कचा वीजपुरवठा खंडित केला होता. तद्नंतर, या पार्कमधील अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागानेही आर्थिक दंड ठोठावला होता. अशा थकबाकीसह अस्वच्छतेमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या या पार्कच्या चालकाने पालिकेचे गेल्या दोन वर्षांचे ४५ लाख ४५ हजार रु. भाडे थकवले आहे. ते वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार नोटिसा पाठवून कारवाईची नोटीसही धाडली होती. परंतु, त्याला त्याने प्रतिसाद न दिल्याने अखेर बांधकाम विभागाने हे पार्कच सील करण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. त्यानुसार, गुरुवारी सील ठोकण्याची कारवाई केली.
मीरा रोडचे वर्धमान फॅण्टसी सील
By admin | Updated: February 20, 2016 02:00 IST