वसई : काँग्रेस पक्षाने उमेदवारीची यादी जाहीर केल्यानंतर वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातील अनिश्चितता दुर झाली. काँग्रेस पक्षासमवेतच जनआंदोलन समिती व बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्यामुळे लढतीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. गेला आठवडाभर उमेदवर कोण असेल यावर सतत चर्चा होत होती. काही प्रमाणात त्याला विराम मिळाला आहे.वसईत मायकल फुर्ट्याडो, पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली. तर वसईचे आ. विवेक पंडीत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बहुजन विकास आघाडीने वसईत अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. परंतु बोईसर व सोपाऱ्यात अनुक्रमे विलास तरे व क्षितिज ठाकूर यांनाच पुढे चाल दिली आहे. आज या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या संध्याकाळपर्यंत लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वसई येथे बहुजन विकास आघाडीतर्फे हितेंद्र ठाकूर हे उद्या अर्ज दाखल करतील अशी सर्वत्र चर्चा आहे. डहाणू व विक्रमगड येथेही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. डहाणू येथे मार्क्स. कम्यु. पक्षामध्ये बंडखोरी झाली असून विद्यमान आ. राजाराम ओझरे यांचे चिरंजीव सुधीर ओझरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अद्याप डहाणू, बोईसर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार अद्याप जाहीर न झाल्यामुळे लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाने उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी नंतर काही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र बहुजन विकास आघाडीसाठी बोईसर व नालासोपारा मतदारसंघ सोडण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वसईत फुर्ट्याडो, पालघरात गावित
By admin | Updated: September 26, 2014 01:35 IST