खोडाळा : पाश्चिमात्य संस्कृतीतील ‘व्हॅलेंटाइन वीक’ आता आपल्या देशातही साजरा होऊ लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन डेच्या विविध दिनविशेषांना सुरुवात होताच प्रेमवीरांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. अनेक युवा आपल्या स्वप्नातील राजकुमारीला मनातील भावना सांगण्यासाठी हा उत्सव साजरा करताना दिसून येत आहेत. मात्र, कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने व्हॅलेंटाइन आठवड्यात गजबजून राहणारे कॉलेज कट्टे विद्यार्थ्यांविना ओस दिसून येत आहेत.‘व्हॅलेंटाइन वीक’ची चर्चा मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन कट्ट्यावर तरुणाईत होत असते. ‘व्हॅलेंटाइन डे आणि तरुणाई’ असे एक समीकरण झालेय. एरव्ही लेक्चर्स बंक करणारे युवक-युवती या सप्ताहात आवर्जून हजर राहतात. कॉलेज कॅन्टीन, कॉलेज कट्टे यांमध्ये तरुणाईची मोठ्या प्रमाणावर रेलचेल दिसते. मात्र, कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन युवकांच्या आनंदात विरजण पडले आहे. त्यामुळे कॉलेज कट्टे ओस पडले आहेत.पूर्वी प्रेम हा शब्द उच्चारताच कान टवकारले जायचे. मात्र, दिवसेंदिवस आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत असल्याने प्रेमदिनाच्या संकल्पनेतही बदल होत आहे. त्यामुळे प्रेमीयुगुले मोठ्या आतुरतेने फेब्रुवारी महिन्याची वाट बघत असतात. अनेकांना या आठवड्यात जीवनभराचे साथीदारही मिळतात, तर अनेकांचा प्रेमभंगही होतो. त्यामुळे व्हॅलेंटाइन वीक हा बहुतांश तरुणांच्या कायम आठवणीत राहणारा उत्सव आहे.काॅलेज कट्टे ओस साधारणपणे महाविद्यालयात प्रेमाला बहर येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे महाविद्यालये सुरू झालीच नाहीत. या वर्षी व्हॅलेंटाइन डेनंतर महाविद्यालये सुरू होणार असल्याने महाविद्यालयीन युवकांना हा दिवस साजरा करण्यास अडचण जाणार आहे. कॉलेज कट्टे ओस राहणार आहेत. दरवर्षी महाविद्यालयीन युवक व्हॅलेंटाइन डे साजरा करायचे; परंतु यंदा व्हॉटस्ॲप, फेसबुक सोशल मीडियावरच व्हॅलेंटाइन साजरा करावा लागणार आहे.
कॉलेज बंद असल्यामुळे ‘व्हॅलेंटाइन वीक’ विरहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:05 IST