कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांचे लसीकरण लस उपलब्ध होत नसल्याने स्थगित करण्यात आले होते. मंगळवारी रात्री कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाल्याने बुधवारपासून सर्व नियोजित केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याकरिता सहा आठवड्यांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. त्या नागरिकांकरिता कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसकरिता कल्याण पूर्व भागातील प्रबोधनकार ठाकरे शाळेत आणि डोंबिवलीतील क्रीडासंकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून करण्यात आले.
त्याचबरोबर अद्याप कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. साठा उपलब्ध होताच कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची व्यवस्था करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण पूर्वीप्रमाणे कल्याणच्या आर्ट गॅलरी येथे ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यावर मोबाइल फोनवर लसीकरणाचे ठिकाण, दिनांक आणि वेळ दर्शविणारा संदेश दाखवून करता येणार आहे. या वयोगटांव्यतिरिक्त अन्य वयोगटांचे लसीकरणही आर्ट गॅलरी येथे होणार नाही. लसीचा पहिला व दुसरा डोस प्राप्त होणाऱ्या उर्वरित लसीकरण केंद्रांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. त्यात १७ ठिकाणे नमूद करण्यात आली आहेत. लसीचा साठा उपलब्ध होईल, त्यानुसार ही केंद्रे सुरू ठेवली जातील. अन्यथा, त्याठिकाणी लसीच्या साठ्याअभावी प्रक्रिया बंद पडू शकते.
---------------
वाचली
.