ठाणे : अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. तसेच, नविन ऊर्जेच्या कामासाठी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप हे मॉडेल न वापरता पब्लिक पब्लिक पार्टनरशिप हे मॉडेल वापरल्यास नागरिकांना फायदेशीर ठरेल. अनावश्यक ऊर्जा जी आपल्या घरात वापरली जाते त्या ऊर्जेचा वापर टाळल्यास बचत झालेल्या ऊर्जेचा वापर हा नविन ऊर्जा उपकरणांसाठी वापरता येईल असे मत ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उर्जा तज्ज्ञ डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी नुकत्याच डेगु , द. कोरिया येथे पार पडलेल्या जागतिक सोलार कॉंग्रेसमध्ये व्यक्त केले. ‘जागतिक सौर उर्जा परिषद या जगातील सौर उर्जा क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या पुढाकाराने दर दोन वर्षांनी, या क्षेत्रात काम करणारे संशोधक, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ , अर्थकारणी, सरकारी धोरणे ठरवणारे यांची चर्चा व्हावी, माहितीची आदान प्रदान व्हावी आणि अपारंपारिक उर्जेच्या प्रसाराला गती व प्रेरणा मिळावी यासाठी या परीषदेचे आयोजन करण्यात येते. यंदा नुकतेच पार पडलेल्या या परिषदेत जागतिक सौर शहर पुढाकार (इंटरनॅशनल सोलार सिटी इनिशिएटिव्ह (इस्की)’ या संस्थेचे संचालक सदस्य या नात्याने डॉ. संजय मं . गो . यांना या परिषदेत मांडणी करण्यासाठी विशेष आमंत्रित केले होते. डॉ. संजय यांनी ठाण्यात राबवित असलेल्या अक्षय ऊर्जा अभियानाची माहिती देताना सांगितले की या अभियानाच्या सूचनांचे पालन ज्या सोसायटींनी केले त्या सोसायटींची विजेची बिले ही 20 ते 30 टक्क्यांनी कमी आलेली आहेत. यावर परिषदेत सहभागी मान्यवरांनी हे अभियान केवळ ठाण्यात नव्हे तर सर्वंच शहरांत वापरावे असे सांगितल्यावर डॉ. संजय यांनी हे अभियान नक्कीच इतर शहरांत राबवता येईल पण त्यासाठी लोकसहभाग देखील आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
अक्षय ऊर्जेसाठी पी पी मॉडेल वापरा
By admin | Updated: November 30, 2015 02:05 IST