उल्हासनगर : महापालिका परिवहन समिती बरखस्तीचा ठराव महासभेने एकमताने फेटाळल्याने परिवहनची बससेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भविष्यात महापालिकेच्या परिवहन बस धावणार असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर खासगी ठेकेदारामार्फत धुमधडाक्यात परिवहन बससेवा त्यांनी सुरू केली. मात्र, अवघ्या साडेतीन वर्षांत तिकीट दरवाढीवरून महापालिका व ठेकेदार आमने-सामने उभे ठाकले. तिकीट दरवाढीस महापालिकेने मंजुरी न दिल्याने ठेकेदाराने बससेवा टप्प्याटप्प्याने बंद केली. या प्रकाराने महापालिका कारभारावर टीका झाली. नागरिकांच्या मागणीनुसार परिवहन बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेने सात वेळा निविदा काढल्या. मात्र, ठेकेदारांनी निविदेला प्रतिसाद दिला नसल्याने अद्याप परिवहन बससेवा सुरू झालेली नाही. तर दुसरीकडे उत्पन्न शून्य असतानाही परिवहन समितीवर लाखोंचा खर्च केला जात असल्याची टीका होऊ लागल्याने अखेर परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत ठेवला होता.
परिवहन समिती बरखस्तीचा ठराव महासभेत पाठविल्यावर, सर्वांच्या नजर ठरावावर होत्या. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी समिती बरखास्तीचा ठराव फेटाळला. तसेच भविष्यात परिवहन बससेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
चौकट
बससेवा सुरू करणार- लहरानी
महापालिका परिवहन बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न समिती व महापालिकेतर्फे सुरू असल्याची माहिती परिवहन समिती सभापती दिनेश लहरानी यांनी दिली. अशावेळी समिती बरखास्तीचा प्रस्ताव महासभेत येणे चुकीचे आहे. लवकरच बससेवा सुरू करण्याला प्राधान्य देणार आहे.