ठाणे : जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींची कार्यालये, २७१ गावांतील स्मशानभूमी, विधिघाट, निवारा शेड सुशोभीकरण, कबरस्तान आदींच्या कायापालटासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ३१ कोटी ६३ लाख रुपये खर्चाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला दिली.
जिल्हा परिषदेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जनसुविधा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातही कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतींची कामे, स्मशानभूमी, विधिघाट, निवारा शेड सुशोभीकरण, कबरस्तान आदींच्या या कामांमुळे गावक-यांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कार्यालयाची कामे झाली नाही. त्यासाठी ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे जिल्हा परिषदेकडे निधी देण्याची मागणी होत होती. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी विषय समित्यांचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या संमतीने ही जनसुविधांची कामे जिल्ह्यात प्राधान्याने हाती घेतली आहेत.
ग्रामपंचायतींच्या नव्या कार्यालयासाठी सहा कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर, ग्रामपंचायत कार्यालय पुनर्बांधणी, दुरुस्ती, कार्यालयांचा विस्तार व सुशोभीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती, कबरस्तान, विधिघाट, पोहाेचरस्ता आदी २७१ गावांच्या कामांसाठी २५ कोटी २३ लाख ५० हजारांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------