ठाणे : ३१ डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाईत नौपाडा आणि कापूरबावडी परिसरात दोघांनी अडथळा आणल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटनांत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.नितीन जंक्शन नाक्यावर वाहतूक उपविभाग वागळेचे पोलीस महेश महाले हे मध्यरात्री २ च्या सुमारास ब्रीथ अॅनालायझरद्वारे तपासणी करीत होते. याचदरम्यान, वागळे इस्टेट येथे राहणारा अनिल यादव याची तपासणी केल्यावर त्याने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले. पण, पकडले जात असल्याचे लक्षात येताच या गोष्टीचा राग मनात धरून अनिलने मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ क रून धक्काबुक्की केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. दुसऱ्या घटनेत, कापूरबावडी वाहतूक शाखेजवळ तेथील पोलीस रंगनाथ सहाणे हे कारवाई करताना, वर्तकनगर परिसरातील अजिज शेख आणि स्वप्नील ठाकरे यांनी त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या शर्टाचा खिसा फाडून नेमप्लेट तोडली. हा प्रकारही मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर दोघांनाही अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की
By admin | Updated: January 3, 2016 03:53 IST