ठाणे : मानलेल्या मामाने कल्याण येथे राहणाऱ्या १६ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी ठाण्यात उघडकीस आला. मुलीच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.पीडित मुलगी मूळची कल्याण पूर्वेतील पिसवली येथील रहिवासी आहे. ठाण्यातील चितळसर मानपाडा भागातील जैन मंदिराजवळ तिचे नातलग राहतात. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ती नातलगाकडे राहण्यासाठी आली होती. तिचा मानलेला मामा विजय जय हा अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी येथे राहतो.पीडित मुलगी ठाण्यातील नातलगाकडे असताना तोदेखील त्यांच्याकडे आला होता. रात्रीच्यावेळी त्याने भाचीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आठ-दहा दिवस पीडित मुलगी बेपत्ता होती. या काळात आरोपीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना कळल्यानंतर त्यांनी तिचा शोध सुरू केला. मुलगी परतल्यानंतर कुटुंबियांना संशय आला. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता, मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत असून, ठाणे, अहमदनगर येथेही पथके रवाना केली आहेत.>मुलीच्या कुटुंबियांनी आधी चितळसर मानपाडा पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दिली होती. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग केले.बुधवारी हे प्रकरण कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.
मानलेल्या मामाचा भाचीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 03:09 IST