सदानंद नाईक , उल्हासनगरमहापालिका शिक्षकांना दोन महिन्यांंपासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारी अनुदान आले नसल्याने पगार दिला नसल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, कंत्राटदारांची बिले वेळेत दिली जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. पालिका शिक्षण मंडळाचे ३० कोटींपेक्षा अधिक अंदाजपत्रक आहे. विविध माध्यमांच्या २८ शाळा असून त्यात ७ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, १७९ शिक्षक आहेत. शिक्षकांच्या पगारासाठी राज्य सरकार व पालिका अर्धा भार उचलते. मात्र, तीन महिन्यांपासून सरकारचे अनुदान आले नसल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांनी दिली. त्यामुळेच शिक्षकांचे पगार दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकाराने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. राज्य सरकारच्या अनुदानाला विलंब झाला, तरी शिक्षण मंडळाच्या निधीतून शिक्षकांचे पगार यापूर्वी दिले जात होते. पालिका शाळांसाठी सुरक्षारक्षक नसल्याने पटांगणात रात्री पार्ट्या होतात, असे शिक्षकांनी सांगितले. तसेच बहुतांश शाळा मुख्याध्यापकांविना आहेत. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मात्र शिक्षण मंडळावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. अन्यथा यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होऊ शकतो.
पालिका शिक्षकांवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: February 10, 2017 04:01 IST