ठाणो : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेने ‘पाणी शुद्धता, पाणी वाचवा आणि पाणी सुरक्षितता’ या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करून पाण्याचे महत्त्व पटवून देणारा ‘जल’ जनजागृती सप्ताह सोमवारपासून जिल्ह्यातील गावपाड्यात सुरू केला आहे. यानुसार येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी जलप्रतिज्ञाही घेतली.
पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. त्याचे महत्त्व अधोरेखित करून त्याची सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर ‘जल’ जनजागृतीपर सप्ताह कार्यक्रम हाती घेतला आहे.
या विविध कार्यक्रमांपैकी प्रमुख्याने जलस्रोताचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरणाच्या स्पर्धा, स्रोत व साठवण टाकी, जलकुंभ सफाई, पाणी वाचविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागतिक जल दिनाचे महत्त्व सांगून जनजागृती, शून्य गळती मोहिमेसाठी शपथ घेणे, पाण्याचे महत्त्व पटवून देणे, जलसाक्षरता नाटिका, निबंध, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतली असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी दिली.