लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राजकीय आशीर्वादासह काही पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालणारी फेरीवाल्यांची साखळी तोडण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केल्यानंतर त्याचे पुढचे पाऊल म्हणून त्यांच्यावर कारवाईसाठी तीन विशेष पथकांची निर्मिती करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही पथके स्टेशन परिसरात २४ तास गस्त घालणार असून एका टीमची गस्त झाल्यानंतर त्यापाठोपाठ दुसरी टीम लगेच कामास लागणार आहे. याची कल्पना इतर टीममधील कोणालाच देण्यात येणार नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कारवाईच्या आधी फेरीवाल्यांना मिळणाऱ्या इशाऱ्यांवरच आता निर्बंध येणार असून पालिका प्रशासनाला कारवाई करणे सोपे होणार आहे. ठामपा उपायुक्त संदीप माळवी यांच्यावरील हल्ल्यानंतर पालिका आयुक्त जयस्वाल कामालीचे आक्र मक झाले असून गुरु वारी स्वत: रस्त्यावर उतरवून त्यांनी गावदेवी परिसरातील गाळ्यांवर कारवाई केली. यामध्ये स्टेशन परिसर स्वत: फिरून त्यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना चांगलाच प्रसाद दिला. आयुक्तांच्या कारवाईनंतर स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी हा परिसर कायमस्वरूपी फेरीवालामुक्त करण्यासाठी आता तीन विशेष टीम स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नौपाडा प्रभाग समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या वेळी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अतिक्र मण पथक येते. मात्र, त्याआधीच त्यांना याच पथकांमधून कोणीतरी याची आगाऊ सूचना देते. त्यामुळे पथकांची पाठ फिरताच ते पुन्हा आहे त्याच जागेवर बसत असल्याने हा प्रकार थांबवण्यासाठीच या विशेष तीन टीम काम करणार आहेत.
फेरीवाल्यांची झिंग उतरवण्यासाठी तीन टीम
By admin | Updated: May 13, 2017 00:52 IST