ठाणे : तीव्र उन्हाळ्यात पाणवठ्यावर येणारे वन्य प्राणी, पशुपक्षी यांची येऊरच्या जंगलात दोन दिवस ‘पाणवठा गणना’ करण्यात आली असता तीन बिबट्यांसह १६ प्रकारचे पशुपक्षी मुक्त संचार करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे. येऊरचे वन अधिकारी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस ‘पाणवठा वन्यजीव गणना’ करण्यात आली. यासाठी जंगलातील ठिकठिकाणच्या पाणवठ्यांवर सुमारे ३० स्वयंसेवकांनी लक्ष ठेवले होते. त्यामध्ये तीन बिबटे, ९२ माकडे, ६४ वानर आदींसह मुंगूस, वाटवाघूळ, रानडुकरे, रानमांजर, चितळ, ससा, सांबर, भेकर, घुबड, रानकोंबड्या, सर्प, गरूड, घोरपड व नाग आढळले आहेत. येऊरच्या या निसर्गरम्य जंगलात २५० पशुपक्षी आहेत, असे या गणनेच्या निमित्ताने आढळून आले. नोंद घेतलेल्या या पक्ष्यांमध्ये श्रीलंकन फ्रॉग माऊथ या नवीन पक्ष्याचा वावर येऊरमध्ये आढळून आला. याशिवाय, मलबार व्हिस्टलिंग थ्रुश, इंडियन हॉर्नबिल, किंगफिशर, ब्राऊन हेडेड बारबेट, लाँग टेलेड ड्रोंगो, इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचेर आणि स्पॉटेड बाबलेर आदींची नोंद झाली. येऊर येथे बांधलेली संरक्षक भिंत ही प्राण्यांसह पक्ष्यांनाही लाभदायक ठरली आहे. यामुळे जंगलात शिरकाव करणाऱ्या लोकांचे लोंढे कमी झाले असून प्राणी, पशुपक्षी मुक्तपणे जंगलात फिरत आहेत. ही गणना मनासारखी करताना मोठा आनंद मिळाल्याचा अनुभव प्राणिमित्र नितेश पांचोळी यांनी सांगितला. (प्रतिनिधी)
येऊरच्या जंगलात आढळले तीन बिबटे !
By admin | Updated: May 23, 2016 02:36 IST