मुरबाड : तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याचे हाल सुरू आहेत. येथे तब्बल तीन दवाखान्यांचा कारभार एकाच डॉक्टरवर सोपवण्यात आला आहे. तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले सावर्णे प्राथमिक आरोग्य केंद्र, न्याहाडी येथील जिल्हा परिषद दवाखाना आणि शिरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धारखिंडी उपकेंद्र, मोरोशी उपकेंद्र, हा अतिदुर्गम ७०-८० गावपाड्यांचा परिसर आहे.सध्या शिरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वंदना मिहरराव या प्रभारी वैद्यकीय अधिकारी असून या दवाखान्यात १०० ते १५० बाह्यरुग्ण उपचार घेतात. शिवाय सर्पदंश, विंचुदंश, बाळंतपणासाठी आलेल्या दररोज दोन महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा व्याप या दवाखान्यावर असताना याच डॉक्टवर सावर्णे आरोग्य केंद्र आणि न्याहाडी जिल्हा परिषदेच्या दवाखान्याचा भार आरोग्य विभागाने सोपवला आहे. शिवाय, धारखिंडी उपकेंद्राचा उरलासुरला भार आहेच. शिवाय, न्याहाडी जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात प्रभारी डॉक्टर आणि एक फार्मासिस्ट व एक शिपाई आहे. या दवाखान्यात ना लाइट ना पाणी, त्यामुळे औषधांची नासाडी, शिवाय दवाखानासुद्धा ग्रामपंचायतीने दिलेल्या मोडकळीस आलेल्या जागेत. स्वत:ची इमारत नाही. हीच तऱ्हा सावर्णे आरोग्य केंद्राची आणि मोरोशी, धारखिंडीची. बाकी सुविधा नाही. किमान आरोग्यसेवा तरी व्यवस्थित देण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
दवाखाने तीन; डॉक्टर मात्र एकच
By admin | Updated: April 24, 2017 23:57 IST