कल्याण : मंत्रालयात नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या सोडतीत कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी आधीच फिल्डिंग लावलेल्या शिवसेना आणि भाजपातील डझनभर नगरसेवकांचे स्वप्न भंगले आहे. मात्र, नगरसेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १२२ नगरसेवक आहेत. यात एकूण ६३ नगरसेविका आहेत. २०१५ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी आरक्षण सोडतीत महापौरपद अनारक्षित होते. महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. सध्या ओबीसी प्रवर्गातील शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर महापौरपदी विराजमान आहेत. मात्र, त्यांच्यानंतरच्या उर्वरित अडीच वर्षांसाठी महापौरपदाची सोडत नुकतीच मंत्रालयात काढण्यात आली. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी महापौरपद राखीव झाले आहे.महापौरपदाचे आरक्षण पुढील अडीच वर्षांसाठी राहणार आहे. महापौरपद हे खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी शिवसेना आणि भाजपातील इच्छुक नगरसेवकांची घोर निराशा झाली आहे. या दोन्ही पक्षांतील अनेक धनदांडगे आणि ज्येष्ठ नगरसेवक महापौरपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते. वेळप्रसंगी काहींनी उपमहापौर, स्थायी समिती व अन्य समित्यांची मोठी पदे नाकारली आहेत. पण, खुल्या गटातील महिला आरक्षणामुळे त्यांचे महापौरपदही हुकल्याने त्यांच्या आशेवर एक प्रकारे पाणी फेरले आहे. त्यामुळे आता उपमहापौरपद व अन्य समित्यांमधील महत्त्वाची पदे पदरात पाडून घेण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे गत्यंतर नाही. दुसरीकडे सध्याच्या महापौरांचादेखील उपमहापौरांसारखा राजीनामा घेऊन उर्वरित सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी अन्य कोणाला तरी संधी देण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी इच्छादेखील व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ नगरसेवकांच्या आशेवर फिरले पाणी
By admin | Updated: February 7, 2017 03:57 IST