प्रशांत माने / कल्याणकल्याण - डोंबिवली महापालिका प्रशासनाने पदोन्नती देताना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पदविका (एल.एस.जी.डी) अभ्यासक्रम बंधनकारक केल्याने ४० ते ४५ ज्येष्ठ कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. सेवेत कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याने सेवाज्येष्ठता डावलली गेल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केली आहे. न्यायासाठी त्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना साकडे घातले आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही याची दखल घेतली गेली जात नसल्याची त्यांची खंत आहे. संबंधित कर्मचारी हे लिपिक वर्गातील आहेत. आतापर्यंत त्यांची ३३ वर्षांची सेवा झाली आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही आस्थापनेच्या सेवेत ३३ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यास तीन पदोन्नत्या मिळतात. परंतु, सध्या या कर्मचाऱ्यांना मीटर चेकर अथवा जकात चेकर या पदावर कालबद्ध पदोन्नतीच मिळाली आहे. सध्या हे कर्मचारी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१० मध्ये तयार केले. त्यास २१ सप्टेंबर २०१० ला सरकारची मान्यता मिळविली आहे. त्यामुळे पूर्वीच्या कल्याण नगरपालिकेचे नियम २० सप्टेंबर २०१० पर्यंत लागू होते. या नियमानुसार लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यास रेकॉर्ड किपर, सिनियर क्लार्क, कमेटी क्लार्क आदी पदांवर पदोन्नतीने नेमणूक देताना लिपिक पदावरील सेवाज्येष्ठता विचारात घेऊन वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जात होती. परंतु, महापालिकेच्या नवीन सेवाशर्ती भरती नियमांत वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देताना एल.एस.जी.डी ही शैक्षणिक पात्रतेची अट बंधनकारक आहे. ती १ सप्टेंबर १९८० ते २० सप्टेंबर २०१० या कालावधीत नेमणूक झालेल्या लिपिक वर्गास लागू होत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ही अट शिथिल करून सेवाज्येष्ठता लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांस सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती द्यावी, अशी विनंती संबंधित कर्मचाऱ्यांनी आयुक्त रवींद्रन यांना केली आहे. यसदंर्भात रवींद्रन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
‘ते’ कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
By admin | Updated: November 15, 2016 04:27 IST