ठाणे : एकीकडे दिव्याच्या डम्पिंगमुळे या भागात दुर्गंधी आणि ४० प्रकारच्या आजारांना येथील नागरिकांना सामना करावा लागत असल्याचे सांगून मनसेने या डम्पिंगविरोधात आंदोलन उभे केले होते. परंतु, पालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात मात्र डम्पिंगच्या भागात प्रदूषण होतच नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे येथील हवेतील प्रदूषणाची चाचणी केली असता त्या ठिकाणी प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण मर्यादित असल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. ३१ मार्च, ३१ मे, ३० जून आणि ३१ आॅगस्ट अशी चार वेळा डम्पिंग गाउंड येथे ही चाचणी केली होती. त्या सर्व निरीक्षणांमध्ये या प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण मर्यादेत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, मार्च २०१६ मध्ये धुलीकणांचे प्रमाण जास्त आढळल्याचे सांगितले जात आहे. ठाणे महापालिका येथे २००५ पासून येथे कचरा टाकण्याचे काम करीत आहे. हा कचरा अनेकदा जाळला जातो. तिथे योग्य फवारणी होत नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य आहे. या कचऱ्यामुळे हवा प्रदूषित झालेली असून अनेकांना श्वसनाचे विकारही जडले आहेत. ही बाब मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर, स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी डम्पिंग ग्राउंडवर आंदोलन छेडले होते. आता पालिकेच्या पर्यावरण अहवालानंतर मनसेने केलेल्या आरोपांची जणू हवाच निघालेली दिसते आहे. (प्रतिनिधी)
दिव्याच्या डम्पिंगवर प्रदूषण नाही
By admin | Updated: December 23, 2016 02:53 IST