मीरारोड - भाईंदरचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयाच्या समस्या - सुविधा आणि कामकाजाचा आढावा सोमवारी आमदार गीता जैन यांनी घेतला असता गडबड आणि भोंगळपणा आढळून आला.
गंभीर अवस्थेतील तसेच अनेक दुर्धर आजारांवर तात्काळ उपचार न करणे, तज्ञ डॉक्टर नसणे, शवपेट्या खराब झाल्याने मृतदेह बाहेर ठेवण्याची पाळी, रुग्णवाहिका सरकारी वा पालिकेचे न देता खाजगी देणे, आवश्यक वैद्यकीय सुविधा नसणे आदी विविध कारणांनी भाईंदरचे जोशी सरकारी रुग्णालय वादग्रस्त ठरले आहे.
आमदार गीता जैन यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांना पाचारण केले होते. या पाहणीत सप्टेंबर २०२३ मध्ये मुदतबाह्य होणारी औषधे सापडल्याने औषध विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
३ डॉक्टर हे कामावर न येताच पगार लाटत असल्याच्या तक्रारी वरून बायोमेट्रिक हजेरी व रजिस्टर यांची तपासणी करा. प्रत्येक डॉक्टर, कर्मचाऱ्यास बायोमेट्रिकची सक्ती असायला हवी. येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले पाहिजेत. अनेक रुग्णांना न तपासताच मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात पाठवले जात असल्या बद्दल संताप जैन यांनी व्यक्त केला. तपासणीसाठी आणले जाणाऱ्या फिर्यादी - पीडित वा आरोपीना अनेक प्रकरणात सरळ शताब्दीला घेऊन जा असे सांगण्यात येत असल्याचे पोलिसांनी देखील सांगितले.
शवपेट्यात मृतदेह १ महिन्या पर्यंतच ठेवायचा असताना ६ महिने पासून मृतदेह ठेवल्याचा प्रकार समोर आला. निकामी आणि नादुरुस्त झालेल्या शवपेट्यांच्या बदल्यात नवीन शवपेट्या बसवल्या जाणार असे प्रशासनाने आश्वस्त केले. तर शवपेट्यांची संख्या वाढवा असे जैन यांनी सांगितले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची माहिती घेत सोनोग्राफी यंत्र, सिटी स्कॅन, एक्सरे, ऑक्सिजन यंत्रणा, जनरेटर, व्हेंटीलेटर मशिन, आय.सी.यु , रुग्णवाहिका, सीसीटीव्ही आदी व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. रक्त तपासणी व मोठ्या शस्त्रक्रियांच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. एन.आय.सी.यु विभाग कार्यान्वित करा. रुग्णालयात परिसरात पोलीस चौकी उभारा. रुग्ण व नातेवाईकांना भेडसविणाऱ्या समस्या बाबत प्रत्येक विभागाच्या मुख्य दरवाज्यावर तक्रार पेटी आणि तक्रार साठी संपर्क क्रमांक, इमेल आयडी याची माहिती लावण्यास जैन यांनी सांगितले.
यावेळी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ऑपरेशन थियेटर १ महिन्यात तसेच लवकरच कॅथलॅब उभारणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जफर तडवी यांनी आश्वस्त केले. तज्ञ डॉक्टर मिळे पर्यंत शहरातील अनुभवी डॉक्टराना पॅनलवर घेण्याची सूचना जैन यांनी केल्या. यावेळी उपायुक्त संजय शिंदे, डॉ.गजानन सानप, डॉ. नंदकिशोर लहाने , माजी नगरसेवक ओमप्रकाश गारोडिया, शरद पाटील, अश्विन कासोदरिया आदी उपस्थित होते.