ठाणे : कळवा खाडी परिसरातील अतिक्रमणांवरच नव्हे, तर ठाण्यातील सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे व त्याकरिता प्रयत्नशील आयुक्त संजीव जयस्वाल यांना ठाणेकर या नात्याने आमचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य व नामांकित ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. कारवाईसंदर्भात विधानसभेत आणि महापालिकेत घेतलेल्या भूमिका हे राजकीय पक्षांचे नाटक असून निवडणुकीच्या तोंडावर अशा परस्परविरोधी भूमिका घेऊन शहर विकासाचा विचका राजकीय पक्ष नेहमीच करतात, असेही ठाणेकरांचे मत आहे. अनधिकृत हा शब्द राजकारणी मंडळी त्यांच्या सोयीने वापरतात. निवडणुका आल्या की, एक भूमिका घेतात आणि त्यानंतर मात्र आपली भूमिका बदलतात. जनतेवरील प्रेमाचे ते नाटक करतात. मुळात शहर विकासाचा आराखडा करताना पर्यावरण, समाजघटकांच्या गरजा, शहराचा एकांगी नव्हे तर सर्वांगीण विकास या दृष्टीने नियोजन आणि त्याची अंमलबजावणी हे अपेक्षित असते. मात्र, हे नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींना सुचत नाही, जमत नाही, असे मत संजय मंगो यांनी व्यक्त केले आहे. नगररचनाकार सुलक्षणा महाजन यांनीही खाडी परिसरातील अतिक्रमणांसंदर्भातील घडामोडींवर नाराजी व्यक्त करत या सगळ्याला राजकीय पक्षच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. मुळात कळवा खाडी हा परिसरच अतिशय संवेदनशील आहे. येथे अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे उभी राहतातच कशी? जर अशी बांधकामे होत असतील तर ती एका दिवसात होत नाहीत. त्यांना जे अभय देतात, त्यांची ती जबाबदारी असून त्यांना शोधले पाहिजे. या परिसरात राहणाऱ्या कुटुंबांची पाहणी करून ते का? कुठून येतात? कशा प्रकारे इथे वास्तव्य करतात, याची चौकशी केली पाहिजे. अशा लोकांसाठी शासनाने दुसऱ्या जागी तरी तात्पुरत्या स्वरूपाची घरांची सोय केली पाहिजे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे पाडापाड करून येथील लोकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही, अशी भूमिका महाजन यांनी घेतली. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या कारवाईला ठाणेकरांचा पाठिंबा
By admin | Updated: December 22, 2016 06:13 IST