लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे मनपा व ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडतर्फे रविवारी, २६ सप्टेंबरला ठाणे फ्रीडम सायक्लोथॉन होणार आहे. त्यात ठामपा ते गेट वे ऑफ इंडिया व तेथून परत अशी सायकल फेरी काढण्यात येत आहे. या फेरीचे उद्घाटन ठाणे मनपा मुख्यालय येथे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते होईल.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण, अतिरिक्त आयुक्त व ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी ६.३० ते सकाळी ११.३० दरम्यान ही सायकल फेरी काढण्यात येईल. तसेच सकाळी ७ ते सकाळी ८ यावेळेत ‘ठाणे- कार फ्री रॅली, सायकल टू वर्क’ हिरानंदानी मेडोस येथे आयोजित केली आहे. तसेच ठाणे-वुमन नाइट सायकलिंग सायंकाळी ७.३० ते ८ यावेळेत कॅडबरी जंक्शन ते उपवन तलाव या मार्गावर आयोजित करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबरला ‘ठाणे फ्रीडम सायक्लोथॉन’
१ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते ९ दरम्यान ठामपा हद्दीत ‘ठाणे फ्रीडम सायक्लोथॉन’ होईल आहे. तर, २ ऑक्टोबरला सकाळी ६.३० ते सकाळी ८ या वेळेत ‘ठाणे जुनिअर चॅम्प’ विहंग व्हॅली येथे तर सकाळी ६.३० ते ८ दरम्यान ठाणे-फ्रीडम सायकल रिपेअर क्लिनिक आणि हेरिटेज सायक्लोथॉन शहरातील तलावपाळी, कौपिनेश्वर मंदिर, सेंट जॉन व मराठी ग्रंथ संग्रहालय येथे होईल, अशी माहिती माळवी यांनी दिली. या ठाणे फ्रीडम सायक्लोथॉनमध्ये शहरातील इपिक राइडर्स, सायकल युग, ग्रोइंग किड्स व आम्ही सायकलप्रेमी आदी सहभाग होतील.
-------------