बदलापूर : बदलापूर पालिकेने करवसुलीचा उच्चांक गाठला आहे. करप्रणालीत बदल केल्याने पालिकेच्या करवसुलीचा आकडा २४ कोटी गृहीत धरला होता. आतापर्यंत पालिकेने २० कोटींवर करवसुली केली आहे. करवसुलीसाठी नागरिकांना कोणताही त्रास न देता ही वसुली केली आहे. बदलापूर पालिकेने करवाढ केल्यानंतर प्रथमच वाढीव करासह वसुली सुरू केली. शहरातील सर्व मालमत्तांचे पूर्ण मूल्यांकन केल्याने करवाढ निश्चित होणार होती. मात्र, घरांसोबत कारखानदारांना कमी कर लावून पालिकेचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्याची फेररचना करून त्यांचे पुन्हा नव्याने मोजमाप करून त्यावर करआकारणी करण्यात आली. त्यामुळे करचोरीचे प्रमाण कमी झाले. पालिकेने या आर्थिक वर्षात २४ कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. त्यातील २० कोेटी ३६ लाखांपेक्षा जास्त कर पालिकेने गोळा केला आहे. २१ मार्चला एकाच दिवसात पालिकेने १ कोटी १० लाख गोळा केले. या करवसुलीमुळे पालिका आपल्या १०० टक्के उद्दिष्टांजवळ पोहोचली आहे. कारखान्यातून पूर्वी केवळ ७४ लाखांचा कर वसूल होत होता. मात्र, आता पूर्ण मूल्यांकन केल्यावर हाच आकडा ४ कोटींवर गेला असून त्यापैकी २ कोटी १० लाख पालिकेने वसूलही केले आहे. रहिवासी विभागातील ९७ हजार मालमत्ताधारकांनी १८ कोटींचा भरणा केला आहे. पालिकेच्या इतिहासातील हा विक्रमी करभरणा असून, यापूर्वी कधीही २० कोटींचा करभरणा झालेला नाही. अवघ्या १० कर्मचाऱ्यांच्या जोरावर झालेल्या या करवसुलीमुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी आणि नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मालमत्ता विभागाचे अभिनंदन केले आहे. गेल्या वर्षी ही रक्कम अवघी ११ कोटी ३७ लाखांची होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)आणखी तीन कोटींचा होणार भरणा नव्या मालमत्तांच्या समावेशाची प्रक्रि या प्रभावीपणे राबवल्याने त्यात २४ हजार नव्या मालमत्तांची भर पडली. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. आठवडाभरात आणखी तीन कोटींचा भरणा होण्याची आशा असल्याचे मालमत्ता विभागाचे प्रमुख भाऊ निपुर्ते यांनी स्पष्ट केले.
२० कोटींवर गेली करवसुली
By admin | Updated: March 29, 2017 05:31 IST