मीरा रोड : ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा भार्इंदरमधील अनैतिक व्यवसायाची केंद्र बनलेल्या बार व लॉजची बेकायदा बांधकामे पाडण्याचे सांगूनही चार महिन्यात कारवाई झाली नाही. हे अत्यंत खेदजनक असल्याचे सांगत आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उपायुक्त दीपक पुजारी यांना चांगलेच खडसावले. कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ‘लोकमत’च्या १९ मार्चच्या अंकात ‘पालिकेचे बेकायदा लॉजला अभय’ हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली.मीरा भार्इंदरमधील आॅर्केट्रा बार व लॉजमध्ये सर्रास शरीरविक्रय व्यवसाय तसेच अनैतिक प्रकार चालत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. हे अड्डे कायमचे मोडून काढायचे असतील तर बार, लॉजची अनधिकृत बांधकामे पाडण्याची भूमिका त्यावेळी तत्कालिन पोलीस अधीक्षक नवल बजाज यांनी घेतली होती. स्थानिक पोलिसांससह ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी पालिका आयुक्तांना वारंवर पत्र देऊन बेकायदा लॉज, बार जमीनदोस्त करण्याची विनंती केली होती. दुसरीकडे उपायुक्त पुजारी यांनी गेल्या आठवड्यात शहरातील काही आर्केस्ट्रा बार व लॉज चालकांची स्वत:च्या दालनात बैठक बोलावून केवळ लपण्यासाठी तयार केलेल्या खोल्या पाडा असा प्रेमळ सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. ‘लोकमत’मधील बातमीनंतर आयुक्त डॉ. गीते यांनी या प्रकरणी अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त दीपक पुजारी यांना खरमरीत पत्र दिले आहे. वारंवार पत्र देवून चार महिन्यांचा कालावधी गेला. मात्र कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बेकायदा लॉजवर त्वरित कारवाई करा
By admin | Updated: March 23, 2017 01:25 IST